महाराष्ट्राचा सुपुत्र देशासाठी शहीद: सुखोई विमान अपघातात आले वीरमरण



मुंबई - आसाम राज्यातील कार्बी आंगलोंग परिसरात प्रशिक्षणादरम्यान भारतीय हवाई दलाचे सुखोई एसयू-30 एमकेआय लढाऊ विमान कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली. या अपघातात दोन वैमानिकांचा मृत्यू झाला असून त्यात महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्याचे सुपुत्र फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर यांचा समावेश आहे. त्यांच्या सोबत स्क्वॉड्रन लीडर अनुज हे देखील या दुर्घटनेत वीरमरण पावले. देशासाठी कर्तव्य बजावताना झालेल्या या बलिदानामुळे संपूर्ण भंडारा जिल्हा शोकमग्न झाला आहे. 

तरुण आणि धाडसी वैमानिक म्हणून ओळख असलेल्या पूर्वेश दुरगकर यांच्या निधनाची बातमी समजताच त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. देशसेवेची स्वप्ने डोळ्यांत ठेवून हवाई दलात दाखल झालेल्या या तरुण वैमानिकाचा प्रवास इतक्या लवकर थांबेल, याची कुणालाही कल्पना नव्हती.

फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर हे भंडारा जिल्ह्यातील शहापूर गावचे रहिवासी होते. लहानपणापासूनच देशसेवेची जिद्द मनात बाळगणाऱ्या पूर्वेश यांनी संरक्षण क्षेत्रात करिअर घडवण्याचा निर्धार केला होता. त्यांनी डिफेन्स सर्व्हिसेस ज्युनिअर कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर हवाई दलात प्रवेश मिळवला. अवघ्या तीन वर्षांपूर्वीच ते प्रशिक्षण पूर्ण करून वैमानिक म्हणून सेवेत दाखल झाले होते. मेहनत, धाडस आणि शिस्त या गुणांमुळे ते आपल्या सहकाऱ्यांमध्ये लोकप्रिय होते. तरुण वयात मिळवलेले हे यश त्यांच्या कुटुंबासाठी अभिमानाची बाब होती. मात्र आता त्यांच्या अचानक निधनामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

विमानाचा अपघात कशामुळे झाला, याबाबत चौकशी

या दुर्घटनेबाबत हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार, 6 मार्च रोजी पहाटे सुमारे एक वाजून काही मिनिटांनी या अपघाताची अधिकृत पुष्टी करण्यात आली. त्या वेळी सुखोई एसयू-30 एमकेआय लढाऊ विमान प्रशिक्षण किंवा नियमित मोहिमेवर होते. उड्डाण सुरू असताना अचानक विमानाचा जमिनीवरील नियंत्रण केंद्राशी संपर्क तुटला. रडारवरून विमान गायब झाल्याचे लक्षात येताच हवाई दलाने तत्काळ सतर्कता जारी केली. 

त्यानंतर शोधमोहीम सुरू करण्यात आली आणि घटनास्थळी तपासासाठी हवाई दलाची विशेष पथक आसाममध्ये पाठवण्यात आले. विमानाचा संपर्क नेमका का तुटला आणि अपघात कशामुळे झाला, याबाबत सध्या चौकशी सुरू असल्याची माहिती हवाई दलाने दिली आहे.

हे ही वाचा ...

अभिनेत्री वर्षा उसगावकर यांची लाखो रुपयांची फसवणूक  

'धुरंधर-२' विषयी मोठी अपडेट, सरप्राईजसाठी तयार राहा

भारतातून निघालेली युद्धनौका बुडवली, ८० ठार; इराणकडून २४ तासांत बदला 



0/Post a Comment/Comments