अहिल्यानगर पोलिसांनी सुमारे १०० सीसीटीव्ही फुटेज तपासत काढला माग, पुढे घडले असे...



अहिल्यानगर - बोल्हेगाव येथील भोरमळा परिसरात घरात एकटी असलेल्या महिलेचा गळा दाबून आणि चाकूचा धाक दाखवून भरदिवसा बळजबरीने चोरी करणार्‍या तिघांना तोफखाना पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली कार, २७ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि १६ हजार रूपयांची रोकड असा एकूण ८ लाख ७० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. परिसरातील शंभरहून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावला.

सुनीता कैलास तुपेरे (वय ५४) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. ९ ऑक्टोबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास त्या आपल्या घरात झोपल्या असताना चोरट्यांनी गळा दाबून व चाकूचा धाक दाखवून १ लाख ३४ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. या घटनेनंतर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने दोन पथके तयार केली. आरोपींचा शोध घेण्यासाठी घटनास्थळाच्या परिसरातील तसेच अन्य ठिकाणचे शंभरहून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्याचबरोबर गोपनीय माहिती आणि मोबाईलसंदर्भातील माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित केली. या तपासातून चोरीमध्ये सहभागी असलेल्या तिघांची ओळख निष्पन्न झाली. या प्रकरणात मनोज गोरख मांजरे (वय २७, रा. गुंडेवस्ती, मातापूर, ता. श्रीरामपूर; सध्या श्रीकृष्णनगर, शिवाजीनगर, कल्याण रोड, अहिल्यानगर), उमेश दिलीप गायकवाड (वय २२, मूळ रा. दिल्ली नाका, कुरण रोड, आंब्रमळा, संगमनेर) आणि पवन ज्ञानेश्वर कुन्हाडे (वय २७, रा. सप्तश्रृंगी मंदिराजवळ, शिरजगाव लौकी, ता. येवला, जि. नाशिक) यांना पोलिसांनी जेरबंद केले.

ही कारवाई पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली, उपनिरीक्षक प्रवीण पाटील, अंमलदार अब्दुलकादर इनामदार, अनिल रोकडे, बाळासाहेब भापसे, अमोल गाडे, भागवत बांगर, कपील गायकवाड, सतीष शिंदे, राहुल गुंड आणि अरूण सांगळे यांच्या पथकाने केली.

हे ही वाचा ...

अहिल्यानगरचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु, ‘या’ ठिकाणाहून आले आहेत १०० भावी डॉक्टर 

सेवा संकल्प अभियानातून २७३ अति तीव्र कुपोषित बालकांच्या पोषणाची जबाबदारी अधिकाऱ्यांकडे

0/Post a Comment/Comments