अहिल्यानगर - आईच्या नावे असलेल्या जमिनीचा फेरफार रद्द करण्याच्या प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी मंडलाधिकाऱ्यांना देण्यासाठी तक्रारदाराकडून ७ हजारांची लाच घेताना सेतु चालकाला नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. नेवासा खुर्द येथील सेतु केंद्रात ४ मार्च रोजी दुपारी ही कारवाई करण्यात आली आहे.
गणेश कचरू घोरपडे (वय ३१, रा.भैरवाडी, ता.नेवासा) असे पकडलेल्या सेतु चालकाचे नाव असून त्याच्या विरुद्ध नेवासा पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम ७ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील तक्रारदार व त्यांचा भाऊ यांच्या आईच्या नावे नेवासा बुद्रुक येथे ८० आर जमीन आहे. या जमिनीचे फेरफार रद्द करण्यासाठी त्यांनी प्रांताधिकारी यांच्या कडे अर्ज केला होता. प्रांताधिकाऱ्यांनी तो मंजूर करत फेरफार रद्द चे आदेश काढले. या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी तक्रारदार १६ फेब्रुवारी रोजी नेवासा खुर्द मंडलाधिकारी कार्यालयात गेले होते.
तेथे कार्यालयाबाहेर त्यांना सेतु चालक गणेश घोरपडे भेटला. त्याने मंडलाधिकारी बाबासाहेब माने यांचे कडून तुमचे काम करून देतो, पण त्यांना देण्यासाठी १२ हजार रुपये द्या अशी मागणी केली. तेव्हा तक्रारदाराच्या भावाने त्याला फोन पे द्वारे ५ हजार रुपये दिले. त्यानंतर १ मार्च रोजी गणेश घोरपडे हा तक्रारदाराला भेटला व त्याने मी तुमचे मंडलाधिकारी बाबासाहेब माने यांचे कडून काम करून दिले आहे. त्यामुळे मला उर्वरित ७ हजार रुपये द्या अशी मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
या तक्रारीच्या अनुषंगाने ४ मार्च रोजी दुपारी १२.३९ ते १२.५१ वाजेच्या कालावधीत नेवासा खुर्द येथील गणेश मल्टीसर्व्हिसेस या सेतु केंद्रात लाचमागणी पडताळणी करण्यात आली. त्यानंतर गणेश घोरपडे याला तक्रारदार यांच्या कडून मंडलाधिकारी बाबासाहेब माने यांच्या साठी ७ हजारांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले.
सदर कारवाई पोलिस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक छाया देवरे, पोलिस अंमलदार गजानन गायकवाड, सचिन सुद्रुक, वैभव सुपेकर, हारून शेख यांच्या पथकाने केली आहे.
हे ही वाचा ...
भारतातून निघालेली युद्धनौका बुडवली, ८० ठार; इराणकडून २४ तासांत बदला
'धुरंधर-२' विषयी मोठी अपडेट, सरप्राईजसाठी तयार राहा

Post a Comment