सौर कृषी पंप देण्याच्या आमिषाने ४० शेतकऱ्यांना घातला लाखोंचा गंडा


श्रीरामपूर - शासकीय योजनेतून सौर कृषी पंप मिळवून देण्याच्या नावाखाली केडगावच्या दोघांनी आणि श्रीगोंदा येथील एकाने श्रीरामपूर येथील सेतू चालकाकडून ४० शेतकऱ्यांचे अर्ज भरून घेवून त्यांच्या कडून सुमारे ५ लाख ४७ हजार रुपये जमा केले त्यानंतर अनेक महिने उलटूनही पंप बसवून न देता आणि त्या शेतकऱ्यांच्या नावासमोर अगोदरच वापरलेल्या शेतकऱ्यांचे ग्राहक क्रमांक टाकून या शेतकऱ्यांची व महावितरणची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी तिघांवर ३ मार्च रोजी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ओंकारेश्वर राजेंद्र रासकर, किरण बोरुडे (दोघे रा. केडगाव, अहिल्यानगर) व संदीप बनकर (रा. श्रीगोंदा) असे गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत. याबाबत संदीप म्हाळू राऊत (वय ३५, रा. निपाणी वडगाव, ता. श्रीरामपूर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचे सेतू केंद्र आहे. त्यांच्या कडे परिसरातील सुमारे ४० शेतकऱ्यांनी सौर कृषी पंप मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज केले होते. या तिघांनी सन २०२४ मध्ये फिर्यादी यांच्याशी संपर्क साधून आपण सोलर कंपनीचे सबडिलर असल्याचे सांगत शेतकऱ्यांना सौर पंप मिळवून देण्याचे अमिष दाखवत या ४० शेतकऱ्यांकडून आगाऊ रकमा जमा करायला लावल्या. फिर्यादी यांनी शेतकऱ्यांकडून सुमारे ५ लाख ४७ हजार रुपये जमा करून रोख आणि ऑनलाईन स्वरुपात या तिघांकडे दिली. त्यानंतर फेब्रुवारी २०२५ पर्यंत एकाही शेतकऱ्याला सौर कृषी पंप बसवून दिला नाही. फिर्यादी यांनी त्यांना अनेकदा संपर्क करुनही आरोपींनी टाळाटाळ केली.

त्यानंतर फिर्यादी यांनी अधिक चौकशी केली असता आरोपींनी या शेतकऱ्यांच्या नावासमोर अगोदरच वापरलेल्या शेतकऱ्यांचे ग्राहक क्रमांक ऑनलाईन टाकलेले असल्याचे आढळून आले. या तिघांनी आपणासह ४० शेतकऱ्यांची आमी महावितरण कंपनीचीही फसवणूक केल्याचे निदर्शनास आल्यावर संदीप राऊत यांनी याबाबत श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादी वरून पोलिसांनी तिघांच्या विरुद्ध बीएनएस कलम ३१८ (२), ३१८ (), () प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. 

फसवणूक टाळण्यासाठी खबरदारी घ्या   

शेतीसाठी दिवसा वीज उपलब्ध व्हावी व वीज खर्चात बचत व्हावी यासाठी शासनाकडून शेतकऱ्यांसाठी ९० ते ९५ टक्के अनुदानावर सौर कृषी पंप योजना राबविली जात आहे. सौर पंप मिळण्यासाठी अर्ज ऑनलाईन केव्हा व कसा करायचा याबाबत माहिती होत नसल्याने अनेक शेतकरी गरज असुनही लाभापासून वंचित आहेत. अशा शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा काही जण उठवत असून शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक करत असल्याच्या घटना अनेक ठिकाणी उघडकीस येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी याबाबत अधिक जागरूकता दाखवून जवळच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधून योजनेची योग्य माहिती घेण्याची गरज आहे.

हे ही वाचा ...

भारतीय विद्यार्थिनीचा टेक्सासमध्ये मृत्यू, क्षणात स्वप्नांचा चुराडा...  

गौतमी पाटील पुन्हा चर्चेत, सोशल मिडीयावर होतेय तुफान व्हायरल... 

प्रसिद्ध अभिनेत्री म्हणाली...'मी माझ्या नवऱ्यापेक्षा जास्त कमावते...' 

इराण-इस्रायल युद्धात महाराष्ट्रातील तरुणाचा मृत्यू, ड्रोनने घेतला बळी 

0/Post a Comment/Comments