अगोदर अपहरणाची तक्रार, नंतर विहिरीत आढळला तरुणीचा मृतदेह, नेमकं काय घडलं?

 


अहिल्यानगर - बहिणींच्या सोबत शेतात गवत आणायला गेलेल्या १६ वर्षीय तरुणीचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ३ मार्च रोजी सायंकाळी वडगाव गुप्ता (ता.नगर) शिवारात उघडकीस आली आहे. वर्षा जनार्दन जाधव (वय १६, रा. वडगाव गुप्ता, ता.नगर) असे मयत तरुणीचे नाव आहे. २ दिवसांपासून ती बेपत्ता होती. अखेर तिचा मृतदेह विहिरीत आढळून आला आहे.

मयत वर्षा ही तिची बहिण व चुलत बहिणी अशा चौघीजणी २ मार्च रोजी दुपारी ४ च्या सुमारास घरापासून अर्धा किलोमीटर असलेल्या शेतात जनावरांसाठी गवत आणण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी गवत काढत असताना वर्षा हिने बहिणींना मी काही वेळात आले असे सांगून ती काही अंतरावर निघून गेली होती. बराच वेळ झाला तरी ती परत न आल्याने बहिणींनी तिची शोधाशोध करत कुटुंबियांना माहिती दिली.

कुटुंबीयांनी ही तिचा शोध घेतला मात्र ती न सापडल्याने शेवटी एमआयडीसी पोलिस ठाण्यात मिसिंगची तक्रार देण्यात आली. पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला करत तिचा शोध सुरु केला होता. दरम्यान नातेवाईक तिचा शोध घेत असताना ३ मार्च रोजी सायंकाळी शेतातील विहिरीत तिचा मृतदेह आढळून आला आहे. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मयत वर्षा ही इयत्ता १० वी ची परीक्षा देत होती, तिच्या पश्चात आई, वडील, १ भाऊ, २ बहिणी असा परिवार आहे.

हे ही वाचा ... 

भारतीय विद्यार्थिनीचा टेक्सासमध्ये मृत्यू, क्षणात स्वप्नांचा चुराडा...  

गौतमी पाटील पुन्हा चर्चेत, सोशल मिडीयावर होतेय तुफान व्हायरल... 

युद्धामुळे वाढलं भारतातील शेतकऱ्यांचं टेन्शन, नेमकं काय काय होणार?  

शिर्डीच्या साईबाबांविषयी व्हिडीओद्वारे पसरवली बदनामीकारक माहिती, भक्तांमध्ये संतापाची लाट 

0/Post a Comment/Comments